बंगळुरू : नवनियुक्त हॉकी प्रशिक्षक मारिन शोर्ड यांनी आगामी आशिया चषक त्यांच्या आणि सीनिअर भारतीय पुरुष संघासाठी नवीन सुरुवात ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.दिग्गज रोलँट ओल्टमन्स यांच्या स्थानी मारिन यांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. मारिन म्हणाले, ‘आशिया चषक माझ्यासाठीच नव्हे तर संघासाठीदेखील नवीन सुरुवात ठरेल. ट्रेनिंग सत्रात सहभागी होणे आणि स्पर्धेत सामना खेळणे यात खूप अंतर आहे. मी ट्रेनिंगदरम्यान संघाच्या सरावावर समाधानी आहे. तसेच आशिया चषकादरम्यान संघ सामन्यात परिस्थितीनुरूप कसा खेळतो, कुठे कमतरता आहे आणि लगेच सुधारण्याची किती आवश्यकता आहे, हे पाहण्याची संधीदेखील मला मिळेल.’प्रशिक्षक मारिन शोर्ड यांच्या मार्गदर्शनात ज्युनिअर खेळाडूंच्या विकासावरही लक्ष दिले जाणार आहे. ते म्हणाले, ‘ज्युनिअर खेळाडूंना सीनिअर खेळाडूंच्या स्तरापर्यंत येण्यास वेळ लागतो आणि या स्तरावर पोहोचण्यासाठी खूप सामने खेळण्याच्या अनुभवाची आवश्यकता असते; परंतु ही आंतरिक प्रतिस्पर्धा आहे जी की, आपल्याला आवडते. ज्युनिअर खेळाडू संघात स्थान मिळवण्यासाठी सीनिअर खेळाडूंवर दबाव वाढवत आहेत आणि याचा भविष्यात फायदा होईल, असे मला वाटते.’ (वृत्तसंस्था)- आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाची सलामीची लढत ११ आॅक्टोबरला जपानविरुद्ध आहे.- भारताला १३ आॅक्टोबरला यजमान बांगलादेश आणि१५ आॅक्टोबरला पारंपरिक पाकिस्तानविरुद्ध दोन हात करायचे आहेत.
आशिया चषक नवीन सुरुवात, भारतीय हॉकी प्रशिक्षक मारिन शोर्ड यांचं मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:26 AM