काकामिगाहारा (जपान) : भारतीय महिला हॉकी संघाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत गत चॅम्पियन जपानचा ४-२ असा धुव्वा उडवून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.गुरजीत कौरने सातव्या आणि नवव्या मिनिटाला असे दोन गोल केले. नवजोत कौरने भारतातर्फे तिसरा गोल केला. लालरेमसियामीने ३८ व्या मिनिटाला गोल करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताची विजेतेपदाची गाठ चीन संघाशी पडणार आहे. भारताने याआधी साखळी लढतीत चीनला ४-१ गोलने नमवले होते. जपानविरुद्ध भारताने सातत्याने पेनल्टी कॉर्नर मिळवताना वर्चस्व ठेवले. ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने सातव्या मिनिटाला जपानचा गोलरक्षक अकियो तनाका हिला चकवताना संघाला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर नवजोत कौरने फॉरवर्ड वंदना कटारिया हिच्यासह मैदानी गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि गुरजीतने गोल करीत भारताची आघाडी ३-0 अशी केली. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला; परंतु या वेळेस तनाका हिने चांगला बचाव केला. प्रारंभीची १५ मिनिटे भारतासाठी जबरदस्त राहिली.जपानच्या शिहो सुजी हिने भारतीय गोलरक्षक सविताला चकवताना १७ व्या मिनिटाला गोल केला. पुढच्याच मिनिटाला युई इशिबाशीने २८ व्या मिनिटाला गोल करीत स्कोर २-३ असा केला. लालरेमसियामीने ३८ व्या मिनिटाला मैदानी गोल करताना भारताची आघाडी ४-२ अशी केली.
आशिया हॉकी : भारतीय महिला अंतिम फेरीत, जपानचा ४-२ पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:05 AM