काकामिगहरा (जपान) : ड्रॅग फ्लिकर गुरजित कौरने नोंदविलेली हॅट्ट्रिक, नवनीत कौर आणि दीप ग्रेसीचे प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने कझाकिस्तान संघाचा ७-१ गोलने पराभव करून एशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.कझाकिस्तानच्या महिलांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. त्यात त्यांच्या वेरा डोमाानेव्हला लढतीच्या दुसºयाच मिनिटाला मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेत तिने आपल्या संघाचा पहिला गोल केला. या गोलमुळे भारतीय महिला थोड्या दडपणाखाली आल्या. मात्र हे दडपण त्यांनी जास्त टिकू दिले नाही. त्यानंतर भारतीय महिलांनी नियोजनपूर्ण खेळ करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी गुरजितने कोणतीही चूक न करता पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करून आपल्या संघाला १-१ गोल बरोबरीत आणले. नंतर भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीने जलद खेळ करून शॉट आणि लॉँग पासेसचा उत्कृष्ट खेळ करून कझाकिस्तान संघाच्या बजावफळीला अनेक वेळा भेदून निर्विवाद वर्चस्व राखले.१६ व्या मिनिटाला भारतीय संघाला मिळालेल्या दुसºया पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर दीप ग्रेसने गोलमध्ये करून आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळून दिली. नंतर भारताच्या नवनीत कौरने २२ व २७ व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल करून आपल्या संघाला ४-१ गोलची आघाडी मिळून दिली. नंतर ४१ व ४२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरद्वारे अनुक्रमे दीप ग्रेस व गुरजीत कौरने गोल करून भारताला ६-१ अशी भक्कम आघाडी मिळून दिली.यानंतर मात्र भारतीय महिलांनी कझाकिस्तानच्या आघाडी फळीला मध्य रेषेपर्यंतसुद्धा येऊ दिले नाही. चेंडू सतत कझाकिस्तानच्या हाफमध्ये होता. यातच ५६ व्या मिनिटाला भारतीय संघाला अजून एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळीसुद्धा गुरजित कौरने कोणतीही चूक न करता चेंडू कझाकिस्ताच्या गोलरक्षकाला चुकवून गोल टाकला. या गोलमुळे भारतीय संघाने हा सामना ७-१ गोलने जिंकला.
एशिया हॉकी चषक: भारतीय महिला उपांत्य फेरीत; गुरजित कौरची हॅट्ट्रिक, कझाकिस्तानचा ७-१ गोलने केला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:13 AM