Asian Champions Trophy Hockey 2023 : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जपानचा धुव्वा उडवला. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर तगड्या मलेशियाचे आव्हान असणार आहे. मलेशियाने उपांत्य फेरीत ६-२ अशा फरकाने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. आकाशदीप सिंग ( १९ मि.) , हरमनप्रीत सिंग ( २३ मि.), मनदीप सिंग ( ३० मि.), सुमित ( ३९ मि.) आणि सेलवम कार्थी ( ५१ मि.) यांनी गोल करून भारताचा ५-० असा विजय पक्का केला. भारताने २०११, २०१६ व २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि ५ वर्षांनंतर त्यांना पुन्हा हा करिष्मा करण्याची संधी आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या पर्वातील दोन अपराजित संघ भारत आणि जपान दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भिडले. २०२१ च्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात ढाका येथे जपानकडून भारताचा ३-५ असा पराभव झाला होता. त्याचा वचपा काढण्याची संधी भारताला घरच्या मैदानावर मिळाली आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ३३ पैकी २७ मध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर जपानला ३ विजय मिळवता आले आहेत. गोलरक्षक पी आर श्रीजेशचा हा भारताकडून ३०० वा सामना आहे. पहिल्या १५ मिनिटांच्या खेळात भारताने आक्रमणाची धार तीव्र ठेवली, परंतु जपानचा बचाव अप्रतिम राहिल्याने दोन्ही संघांना गोलशून्यवर समाधान मानावे लागले.
दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी चेंडू एकमेकांकडे पास देत सर्कलपर्यंत नेला आणि आकाशदीप सिंगने अप्रतिम कौशल्य दाखवताना मैदानी गोल करून भारताला १९व्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढील चौथ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने ही आघाडी २-० अशी मजबूत करून जपानच्या बचावफळीला सैरभैर केलं. त्याचा फायदा ३०व्या मिनिटाला मनप्रीत सिंगच्या पासवर मनदीप सिंगने मैदानी गोल करून पहिल्या हाफमध्ये ३-० अशी आघाडी मजबूत केली.