नवी दिल्ला - ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग आणि स्ट्रायकर आकाशदीप सिंग यांनी भारतीय पुरूष हॉकी संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठी 18 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत जेतेपद पटकावून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची भारताला संधी आहे. जकार्ता येथे 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आशियाई स्पर्धा होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्या संघात केवळ दोनच बदल करण्यात आले आहेत. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत रूपिंदरला विश्रांती देण्यात आली होती. त्याला जरमनप्रीत सिंगच्या जागी, तर आकाशदीपला दुखापतग्रस्त रमणदीप सिंगच्या जागी संधी मिळाली आहे. या संघाचे नेतृत्व गोलरक्षक पी. आर. श्रीजेश करणार आहे. भारताने 2014च्या आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला नमवून सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करून 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची थेट प्रवेशिका मिळवण्याचा भारतीय खेळाडूंचा निर्धार आहे.
Asian Game 2018 : पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट रूपिंदरपालचे कमबॅक; भारताचा हॉकी संघ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 9:19 PM