जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष विभागात श्रीलंकेवर 20-0 दणदणीत विजय मिळवला. भारताचा हा अखेरचा साखळी सामना होता. त्यामुळे या सामन्यात भारताचे किती गोल होतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. या सामन्यात भारताच्या अक्षदीप सिंगने तब्बल सहा गोल लगावले. त्याचबरोबर हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी तीन गोल केले.
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला भारताला पेनेल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. भारताच्या रुपिंदर पाल सिंगने या संधीचे सोने करत भारताच्या गोलचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या सहाव्या मिनिटाला भारताला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगने यावेळी गोल केला आणि भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या दहाव्या मिनिटाला भारताने तिसरा गोल केला. भारताच्या अक्षदीप सिंगने सुरेख फटका लगावत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी पुन्हा एकदा अक्षदीप सिंग प्रकाशझोतात आला. कारण पुन्हा एकदा गोल करत त्याने भारताला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताने 4-0 अशी आघाडी मिळवली होती.
सामन्याच्या 18व्या मिनिटाला अक्षदीप सिंगने गोल केला, त्याचा हा वैयक्तिक तिसरा आणि संघाचा पाचवा गोल ठरला. त्यानंतर भारताने सातत्याने गोल करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.