जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या पुरुषांसह महिला हॉकी संघालाही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारताला 2-1 असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले, तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
भारताचा संघ पहिल्या सत्रात पिछाडीवर होता. कारण जपानच्या शिमिझू मिनामी 11 व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर मात्र पहिल्या सत्रात जपानने 1-0 अशी आघाडी कायम राखली होती.
दुसऱ्या सत्रात भारताने आपले खाते उघडले आणि जपानबरोबर 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या नेहा गोयलने 25 व्या मिनिटाला गोल केला. या गोलनंतर भारताचे मनोबल उंचावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारताने जपानशी 1-1 बरोबरी केली होती.
पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळात भारत आणि जपान यांची 1-1 अशी बरोबर होती.
तिसऱ्या सत्रात जपानला दुसरा पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या दुसऱ्या पेनेल्टी कॉर्नरचाही जपानने चांगला फायदा उचलला. जपानच्या मोटोमी कावामुराने 44 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.