जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत ऐटित प्रवेश केला आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकीतील सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न भारतीय क्रीडा प्रेमी पाहत आहेत. पण, भारतीय पुरुष संघाच्या मार्गात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अडथळा निर्माण करू शकतो. भारतीय पुरुष संघाने अ गटातील पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत धडक दिली. पाच सामन्यांत जवळपास 76 गोल्सचा पाऊस पाडला, तर प्रतिस्पर्धी संघांना केवळ तीनच सामने भारताविरोधात करता आले. भारतीय खेळाडूंचा खेळ पाहता त्यांना जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. उपांत्य फेरीत भारताला मलेशियाचे आव्हान पेलावे लागेल. मलेशियाने ब गटात 12 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांनीही 41 गोल केले, तर केवळ 6 गोल प्रतिस्पर्धी संघाला करू दिले. त्यामुळे उपांत्य फेरीत दोन्ही संघांच्या बचावफळीचा कस लागणार आहे.भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघही चांगलाच फॉर्मात आहे. त्यांनीही गटातील पाचही सामने जिंकून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासमोर जपानचे आव्हान असणार आहे. जपानने अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांना नमवणे इतके सोपं जाणार नाही. पण, 2022च्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आशियाई सुवर्णपदक जिंकणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ते जंगजंग पछाडण्यास सज्ज आहेत.उपांत्य फेरीच्या अपेक्षित असलेल्या निकालानुसार भारत आणि पाकिस्तान यांना विजय मिळवल्यास अंतिम फेरीत गोल्डन सामना पाहायला मिळेल. पण, भारतीय संघही ऑलिम्पिकचा थेट प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणे अपेक्षित आहे. या दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकूया...