मुंबई - आशियाई स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारताचा 500 हून अधिक जणांचा चमू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी जकार्ता येथे दाखल होणार आहे. या स्पर्धेत दीपा कर्माकर, पी. व्ही, सिंधू, सायना नेहवाल, हिमा दास, नीरज चोप्रा यांच्यासह भारतीय पुरूष हॉकी संघाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. 2014 च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाकडून पुन्हा सुवर्णपदकाची आस लागली आहे.
अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2014चा सुवर्णकित्ता गिरवण्यासाठी सज्ज आहे. 2014 च्या स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभूत केले होते आणि आशियाई स्पर्धेतील हॉकीमधील 16 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्या स्पर्धेत श्रीजेश हा भारतीय संघाचा उपकर्णधार होता आणि यंदा तो कर्णधार आहे.
आशियाई स्पर्धेत खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेला श्रीजेश सहका-यांवर कोणतेही दडपण निर्माण होऊ नये याचीही दक्षता घेत आहे. त्यामुळेच त्याने सहका-यांसोबत चक्क डान्स केला. आशियाई स्पर्धेत भारतीय संघ 20 ऑगस्टला इंडोनेशियाविरूद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.