जकार्ता - भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. भारताने गटातील चौथ्या लढतीत दक्षिण कोरियावर 5-3 असा दणदणीत विजय मिळवला.
भारतीय संघाने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करताना भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. एस व्ही सुनील आपल्या अनुभवाच्या जोरावर दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना चांगले चकवत होता. चौथ्या मिनिटाला चिंग्लेनसाना सिंगने सुरेख मैदानी गोल करताना भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. पहिल्या पंधरा मिनिटांत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले.
दुसऱ्या सत्रातही भारतीय खेळाडूंनी सामन्यावरील पकड कायम राखली. 16व्या मिनिटाला ललित उपाध्यायने तिसऱ्या गोलची नोंद करून भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. पण, कोरियाच्या खेळाडूंनी बचावात सुधारणा करताना भारताला केवळ एका गोलवर समाधान मानण्यास भाग पाडले. मध्यंतराला भारताकडे 3-0 अशी आघाडी होती.मध्यंतरानंतर कोरियाकडून पलटवार झाला. कोरियाच्या जुंग मानजे याने 33 व 32 व्या मिनिटाला गोल करताना पिछाडी 2-3 अशी कमी केली. कोरियाच्या या कमबॅकमुळे भारतीय खेळाडू चांगलेच बावरले होते, परंतु त्यांनी वेळेत स्वतःला सावरले. त्यानंतर मनप्रीत सिंग व आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताला पुन्हा 5-2 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरच्या मिनिटापर्यंत कोरियाकडून बरोबरीचे प्रयत्न झाले. त्यांना शेवटच्या मिनिटात दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यांना बरोबरी साधता आली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना एक गोल करण्यात यश मिळाले. पण, भारताला 5-3 असा विजय मिळवण्यात यश आले.