जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : उपांत्य लढतीत निर्धारीत वेळे भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये 2-2 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या पनेल्टी शूटआऊटमध्ये मलेशियानेभारतावर 7-6 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. निर्धारीत वेळेत भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि वरुण कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केले.
तिसऱ्या सत्रामध्ये सामन्याच्या 33व्या मिनिटाला भारताला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा पुरेपूर फायदा भारताच्या संघाने उचलला. भारताच्या हरमनप्रीत सिंगने भारतासाठी हा पहिला गोल केला.
भारताला मिळालेली ही 1-0 अशी आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. मलेशियाच्या सारी फैझलने गोल केला आणि भारताशी 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताने पुन्हा एकदा 40व्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नवर गोल केला आणि सामन्यात 2-1 अशी आघाडी मिळवली. भारताकडून हा दुसरा गोल वरुण कुमारने केला. त्यानंतर सामना संपायला फक्त दोन मिनिटे शिल्लक असताना मलेशियाने पेनेल्टी कॉर्नरवर गोल केला आणि सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.
पहिल्या दोन्ही सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. त्यामुळे सामन्यातील पहिली 30 मिनिटे ही गोलशून्य बरोबरीत सुटली होती. पण सामन्याच्या तिसऱ्या सत्रात मात्र भारताला गोल करण्यात यश आले.