अभिजित देशमुख"कुठल्याही भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीच सलग दोन सुवर्ण पदकं जिंकलेली नाहीत. आम्ही जकार्ता मध्ये इतिहास घडवायला आलो आहोत " असे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
"आम्हाला आत्मविश्वास आहे, मात्र अतिआत्मविश्वास नाही, आम्हाला माहित आहे की, आम्ही कोणत्याही विरोधी संघाला कमी लेखू शकत नाही. खरं तर स्पर्धेच्या अशा पातळीवर कुठलाही संघ विरोधी संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. आम्ही चांगले प्रदर्शन करत आहोत, सर्व खेळाडू फिट आहेत आणि उत्सुकतेने पहिल्या सामन्याची वाट पाहत आहेत," असे सिंग यांनी सांगितले.
भारतीय पुरुष संघ 'अ' गटात असून दक्षिण कोरिया, जपान, श्रीलंका, हाँगकाँग आणि यजमान इंडोनेशिया यांचाही या गटात समावेश आहे. २० ऑगस्टला भारताची यजमान इंडोनेशियाशी गाठ आहे. "हा गट सोपा नाही, माजी विजेता कोरिया, जपान आणि हाँगकाँग हे बलाढ्य संघ आहेत. आमचे डावपेच अगदी साधे आहेत, मला क्लिष्ट धोरणामध्ये विश्वास नाही. खेळाडूंना माझा सल्ला सरळ आणि सोपे हॉकी खेळण्याचा आहे. खेळाडूंना याची जाणीव आहे की 2020 च्या टोकियो ओलंपिकमध्ये आम्हाला थेट प्रवेश इथूनच मिळेल. खेळाडूंच्या फिटनेसच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. आजच्या हॉकी युगात खेळामध्ये कौशल्य तर पाहिजेच सोबत गती असणे अत्यावश्यक आहे. सामन्यात, शंभर टक्के फिटनेस आणि गती असणे अत्यावश्यक आहे. अॅस्ट्रोटर्फवर ६० मिनटं टिकून राहणे सोपं नाही, त्यामुळे प्रारंभी अकरा खेळाडूं निवडताना फिटनेस आणि गती या दोन गोष्टीचा विचार केला जाणार आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले.
सिंग यांनी इतर संघांविषयी विशेषकरून पाकिस्तानविषयी बोलण्यास नकार दिला. "इतर संघांबद्दल काही विचार करू नका, लक्ष केंद्रित करा आणि फिट रहा असा सोपा सल्ला मी खेळाडूंना दिला आहे. आम्ही प्रत्येक विरोध गंभीरपणे घेतो कारण, त्यामुळे एक योजना तयार होते, आम्ही प्रत्येक सामन्यासाठी परिस्थितीनुसार योजना करतो. या स्पर्धेत आम्ही सर्वोच्च स्थानावर आहोत आणि त्यामुळे इतर संघांपेक्षा आम्हाला मानसिक फायदा सुद्धा होतो परंतु समन्याच्या दिवशी संघ कशा प्रकारे खेळतो यावर सर्वकाही अवलंबून असते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमचे पेनल्टी कॉर्नरच्या वेळी प्रदर्शन फार चांगले नव्हते. आम्हाला त्यामध्ये सुधारणे आवश्यक आहे आणि आम्ही त्यावर काम करीत आहोत. आम्ही पेनल्टी कॉर्नरमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आम्हाला जास्तीत जास्त गोल करून आघाडी घेऊन ती राखून ठेवायाची आहे,'' असेही त्यांनी सांगितले.
कर्णधार पी आर श्रीजेश म्हणाला की, " सर्व खेळाडूं फिट आहेत, हा संघ अतिशय संतुलित आहे. सरासरी सर्व खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. केवळ दोन किंवा तीन खेळाडूंनी कमी सामने खेळले आहेत."
"येथील विजय आम्हाला टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जवळजवळ दोन वर्षे देईल, येथील चांगल्या कामगिरीमुळे विश्वचषकापूर्वी संघाचे मनोबल वाढेल", असे मत माजी कर्णधार व मिडफिएल्डर सरदार सिंग यांनी व्यक्त केले.