नवी दिल्ली : अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारताला आयर्लंडकडून 2-3 असा फरकाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना स्पर्धेत पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवता येणार आहे. शनिवारी पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी भारताला लढत द्यावी लागणार आहे.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताकडे दोनदा आघाडी होती, पण या आघाडीचा फायदा भारताला उचलता आला नाही. भारताने सामन्याच्या सुरुवातीला 1-0 अशी आघाडी मिळवली होती, त्यानंतर आयर्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली तरी भारताने त्यानंतर 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.
भारताच्या रमणदीप सिंगने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आयर्लंडच्या शेन ओ डोनोग्यू याने गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. पण त्यानंतर दोन मिनिटांनीच भारताच्या अमित रोहिदासने गोल केला आणि भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या 26व्या मिनिटाला भारताकडे 2-1 अशी आघाडी होती. त्यानंतर दहा मिनिटांमध्ये जोरदार आक्रमण पाहायला मिळाले. पण 10 मिनिटांमध्ये एकही गोल झाला नाही. त्यानंतर सामन्याच्या 36व्या मिनिटाला आयर्लंडच्या सीन मरेने गोल केला आणि भारताबरोबर 2-2 अशी बरोबरी साधली.
भारताबरोबर 2-2 अशी बरोबरी झाल्यावर आयर्लंडकडून जोरदार आक्रमण पाहायला मिळाले. सामन्याच्या 42 व्या मिनिटाला ली कोलने गोल करत आयर्लंडला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मिळवल्यावर आयर्लंडने बचावावर अधिक भर दिला. अखेरच्या मिनिटांमध्ये भारताने आक्रमण केले, पण त्यांना आयर्लंडचा बचाव भेदता आला नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.