भुवनेश्वर : सडनडेथपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने नेदरलॅँडचा ३-२ गोलने पराभव करत हॉकीचे विश्वविजेतेपद पटकावले. येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत कोणत्याही संघाला गोल करत आला नाही. पेनल्टी शूटआऊटवर हा सामना पुन्हा २-२ असा बरोबरीत राहिला. बेल्जियमने सडनडेथवर गोल करत प्रथमच जेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहचलेल्या बेल्जियमने अंतिम सामन्यात बलाढ्य नेदरलॅँडला गोल करण्यापासून रोखले. आॅस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या नेदरलॅँडला कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या.
निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमकडून वॉन ओबेल फ्लोरेंट व वेगनेज व्हिक्टर यांनी गोल केले तर त्यांच्या वॉन आॅर्थर, डेनायेर फेलिक्स व डे स्लूवेर यांना गोल करण्यात अपयश आले. नेदरलॅँडकडून जेरॉन हर्ट्सबर्गर व जियुस जोन्स यांनी गोल केले. मिरको प्रुजर, वॉन सीव व वॉन थिस यांना गोल करता आला नाही. सामना सडनडेथवर गेल्यानंतर बेल्जियमच्या वॉन ओबेल याने गोल केला तर नेदरलंडच्या हर्ट्सबर्गरला गोल नोंदवता आला नाही.
पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचलेल्या बेल्जियमने विश्वविजेतेपद पटकावले. मागील विश्वचषक स्पर्धेत बेल्जियम पाचव्या स्थानी राहिले होते. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलॅँडला मागील विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.