मुंबई - 2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. जेव्हा कधी क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने बाजी मारली, तेव्हा प्रत्येक न्यूज चॅनल्स तसेच मैदानावरही ‘चक दे इंडिया’ गाणे वाजवले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात भारतीय हॉकीने केलेल्या प्रगतीकडे पाहता ख-या अर्थाने ‘चक दे इंडिया’ गाजतंय. काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष संघाने ढाका येथे मलेशियाला 2-1 असे नमवून तिस-यांदा आशिया चषक पटकावला, तर रविवारी भारताच्या महिलांनी अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात चीनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करत दुस-यांदा आशिया चषक उंचावला.
2017 मध्ये भारतीय हॉकी संघानं केलेल्या कामगिरीचा आढावा आपण घेणार आहे. बेल्जियमचा पराभव करत जूनियर विश्व कपवर नाव कोरत भारतीय हॉकी संघानं 2016 चा शेवट गोड केला होता. 2017 हे वर्ष भारतीय हॉकी संघासाठी कभी खुशी कभी गम सारखं गेलं आहे. 2017 मध्ये संघानं दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकावर नाव कोरलं. तसेच हॉकी स्पर्धेचं यशस्वी आयोजन करत आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये भारताचे नाव उंचावलं गेलं.
भारताच्या सिनियर हॉकी संघानं मलेशियाला नमवून तिस-यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. पण भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी विश्व लीग स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीयांनी कांस्य पदकावार समाधान मानावं लागले. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघानं 13 वर्षानंतर आशिया चषकावर नाव कोरलं. आत्मविश्वास बळावलेल्या भारतीय महिला संघ पुढील वर्षी होणा-या विश्वचषक स्पर्धेतही नक्कीच बाजी मारेल .
कोचच्या नव्या नियुक्ती - भारतीय पुरुष संघाचे कोच रोलेंट ओल्टमेंस यांना संघाच्या सरासरी कामगिरीमुळे राजीनामा द्यावा लागला. जूनियर विश्व कप विजेता कोच हरेंद्र सिंह यांना यावर्षी भारतीय महिला संघाचे कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं. महिला संघाचे कोच असलेले नेटरलँडचे शोर्ड मारिन यांना भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कोच पदाचा भार सोपवण्यात आला. ज्यूनियर हॉकी संघाला जूड फेलिक्स यांच्या रुपाने नवे कोच मिळाले. हरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघानं आशिया हॉकी चषकावर नाव कोरलं. शोर्ड मारिन पहिलेच परदेशी कोच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष संघानं दोन चषकावर नाव कोरलं. यामध्ये आशिया कप आणि हॉकी विश्व लीगचा समावेश आहे.
पी. आर. श्रीजेशला दुखापत - रिओ ऑलंपिकमधील खराब प्रदर्शनातून बोध घेत भारतीय संघानं एप्रिलमध्ये अजलन शाह कपमध्ये कांस्य मिळवले. अजलन शाह हॉकी चषकामध्ये न्यूझीलंडचा पराभव करत भारतानं कांस्य पदाकावर नाव कोरलं. अजलन शाह चषकामध्ये नियमित गोलकिपर आणि कर्णधार पी. आर. श्रीजेश याला दुखापत झाली होती. अद्याप तो दुखापतीतून सावरला नाही.
बेल्जियमचा पराभव - जर्मनीत रंगलेल्या तीन देशांच्या मालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या बलाढ्या बेल्जियमचा पराभव केला. बेल्जियमचा पराभव हा भारतीय संघाचे मानसिक मनोबल वाढवण्यासाठी कामी आला. त्यानंतर भारतीय संघानं मागे वळून पाहिलेच नाही.
कॅनडा-मलेशियाकडून भारताचा पराभव, कोचचा राजीनामा - जूनमध्ये लंडन येथे रंगलेल्या हॉकी विश्व लीगच्या उपांत्य सामन्यात भारताची कामगिरी निराशजनक राहिली. भारताच्या या कामगिरीचा फटका कोच ओल्टमेंस यांना बसला. त्यांना कोचपदापरुन राजीनामा द्यावा लागला. या मालिकेत भारताला कॅनडा आणि मलेशियासारख्या कमजोर संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. हॉकी विश्व लीगमध्ये भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. हॉकी विश्व लीगमध्ये भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. या स्पर्धेत भारताचा हा एकमेव विजय.
युवा संघानं नेदरलँडचा पाडला फडशा - युरोप चषकामध्ये भारताच्या नऊ युवा खेळाडूंना ज्यूनियर संघात स्थान देण्यात आलं. यामध्ये 2016मध्ये लखनऊमध्ये विश्वचषक विजयात त्यांचे महत्वपुर्ण योगदान होतं. युवा खेळाडूंना दिलेल्या संधीमुळे निवडसमीती आणि कोच ओल्टमेंस यांच्यामध्ये मनमुटाव झाला होता. युवा खेळाडूंच्या निवडीमुळे ओल्टमेंस नाराज होते. पण युवा खेळडूनं नेदरलँडचा दोन वेळा पराभव करत निवडसमीतीचा निर्णय योग्य ठरवला होता.
महिला संघाचे कोच मारिन यांना भारतीय सिनियर संघाच्या कोचची जबाबदारी देण्यात आली त्यावेळी आच्छर्य व्यक्त करण्यात आलं होतं. कारण. ज्यूनियर संघाचे हरेंद्र सिंह यांची कोच म्हणून निवड होण्याची शक्यता असताना मरिन यांचे निवड झाली होती. मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या सिनियर संघानं ढाका येथे आशिया चषकावर नाव कोरलं. भाकतानं अंतिम सामन्यात मलेशियाचा 2-1नं पराभव केला होता.
अविस्मरणीय हॉकी विश्व लीग - भुवनेश्वर येथे वर्षाखेरीस झालेल्या हॉकी विश्व लीग स्पर्धेत भारतानं आपली कामगिरी उत्कृष्ट केली. यावेळी प्रेषकांनीही संघाचे मनोबल वाढवलं. हॉकी विश्व लीग स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीयांनी कांस्य पदकाच्या निर्णायक लढतीत जर्मनीचा 2-1 असा पाडाव करत बाजी मारली. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांनी भारतीय संघाला प्रोत्साहन द्यायला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या जोरावरच भारतीय खेळाडूंनी कांस्यपदक निसटू दिले नाही. एस. व्ही. सुनील (21वे मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (54) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचे कांस्य पदक निश्चित करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी मार्क अॅपेल याने जर्मनीचा एकमेव गोल साकारला. विशेष म्हणजे मार्क या सामन्यात गोलरक्षक ऐवजी मध्यक्रम फळीमध्ये खेळत होता. दरम्यान, खेळाडूंच्या दुखापतीमुळे जर्मनीने या सामन्यात आपल्या अनेक राखीव खेळाडूंना मैदानात उतरवले होते.
खेलरत्न पुरस्कार मिळवणा-या सरदारला वगळले - भुवनेश्वरमध्ये झालेल्या हॉकी विश्व लीग फायनल्ससाठी भारताच्या 18 सदस्यांच्या संघामध्ये अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगला वगळण्यात आले. त्याचवेळी रूपिंदर सिंग आणि वीरेंद्र लाकडा यांचे पुनरागमन झालं. या वर्षी खेलरत्न पुरस्कार मिळवणा-या सरदारला वगळले जाणे हे धक्कादायक आहे. गेल्या महिन्यात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. माजी कर्णधाराच्या करिअरचा अंत म्हणून याकडे पाहिले जात आहे. आशिया चषकात सरदारने मिडफिल्डमध्ये प्लेमेकरची भूमिका बजावण्याऐवजी युवा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत डिफेंडर म्हणून खेळ केला होता. रूपिंदरने भारतासाठी या आधीचा सामना हॉकी विश्व लीग सेमीफायनल्समध्ये युरोप दौ-यात खेळला होता, तर लाकडा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग होता.
भारतीय महिला संघ आठव्या स्थानी - जोहन्सबर्ग येथे हॉकी विश्व लीगमध्ये भारतीय महिला संघ आठव्या स्थानावर राहिला. यास्पर्धेत भारतीय संघाला फक्त एक विजय मिळवता आला. या स्पर्धेत भारतीय संघानं चिलीचा पराभव केला. जोहन्सबर्ग येथील खराब कामगिरीनंतर भारतीय महिला हॉकी संघाच्या कोचपदी हरेंद्र यांची निवड करण्यात आली. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संघानं आपली कामगिरी उंचावत 13 वर्षानंतर आशिया चषकावर नाव कोरलं. भारतीय महिला संघानं प्रथमच एफआईएच रँकीगमध्ये पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं.
भारतीय हॉकीसाठी कसं असेल 2018 - 2018 वर्ष भारतीय हॉकी संघासाठी दिशा आणि दशा ठरवणार असणार आहे. एप्रिल 2018मध्ये भारत ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमधील राष्ट्रमंडळ खेळात सहभागी होईल. त्याचबरोबर, ऑगस्टमध्ये जकार्तात आशियाई खेळामध्ये आपला सहभाग घेईल. नोव्हेंबर 2018 मध्ये भुवनेश्वरमध्ये सिनियर हॉकी विश्व कपमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत हॉकी महाशक्ती बनण्याच्या दिशेनं पावले उचलेल.