भुवनेश्वर: देशभरातील क्रिकेटप्रेमी भारत-श्रीलंका कसोटी सामन्यातील उत्सुकता अनुभवत असले तरी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर शहरात हॉकीचीच चर्चा आहे.बीजू पटनायक विमानतळापासून विश्व हॉकी लीगचे पोस्टर आणि बॅनर्स झळकले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याच्यासह स्टार खेळाडूंचे ‘कट आऊट्स’ ओडिशाला हॉकीची नर्सरी का म्हटले जाते याची साक्ष देतात. रेस्टॉरेंट, कॅफे आणि सार्वजनिक ठिकाणी भारतीय चाहते संघाच्या कामगिरीवर चर्चा करताना दिसतात.भारतीय संघ साखळीत एकही विजय नोंदवू शकला नाही, याबद्दल युवा चाहते निराश आहेत. कलिंगा स्टेडियमवर उसळणारी गर्दी भारताचा विजय पाहण्यास आतूर आहे. किमान उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्धची लढत कठीण होती पण इंग्लंड आणि जर्मनीला भारत पराभूत करेल, अशी चाहत्यांना आशा होती. पण दोन्ही सामने भारताने गमावले. उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळविण्याच्या हेतूने भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)इंग्लंड संघाच्या बॅरी मिडलटनचा४०० वा सामनाइंग्लंड संघातील अनुभवी बॅरी मिडलटन हा ४०० सामने खेळणाºया निवडक खेळाडूंच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. त्याने काल आॅस्ट्रेलियाविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या लढतीत ही कामगिरी केली. या संदर्भात विचारताच गमतीने तो म्हणाला,‘माझ्यामते मी म्हातारा झालो आहे. पण सध्या निवृत्तीचा विचार नाही. भविष्यात विश्रांती मिळालीच तर हॉकी सामने पाहात राहील. या कामगिरीचा मला अभिमान वाटतो.’भारतीय संघाची सरावाला दांडीजर्मनीकडून झालेल्या पराभवानंतर गटात एकही विजय नोंदवू न शकलेल्या भारतीय संघाने आज सरावाला दांडी मारली. भारताचा सकाळच्या सत्रात सराव होईल, अशी माहिती मिळाली होती. पण नंतर आऊटडोअर सराव रद्द करण्यात आला. खेळाडूंनी हॉटेलमध्येच थांबणे पसंत केले. मीडियाशी कुणीही चर्चा केली नाही. भारताला ‘ब’ गटात जर्मनी, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियानंतर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत अ गटात अव्वल स्थानावर राहिलेल्या संघाचे भारतापुढे आव्हान असेल.
भुवनेश्वर रंगले हॉकीच्या रंगात...भारतीय संघ मात्र अद्याप विजयापासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:59 AM