अमरावती : श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या ऑल इंडिया वुमेन्स हॉकी टुर्नामेटंच्या अंतिम सामन्यात खेलो इंडिया बिलासपूरच्या तरुणींनी साई मुंबई टिमवर मात करीत विजय प्राप्त करत मेजर ध्यानचंद कपवर आपले नाव कोरले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त जेसीआय इंडिया आणि अमरावती जिल्हा महिला हॉकी अकादमीच्या वतीने २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ऑल इंडिया वुमेन्स हॉकी टुर्नामेंटचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब पुसदेकर, सदस्य श्री हेमंत काळमेघ, सुभाष बनसोड, माजी महापौर विलास इंगोले, जेसीआयचे अध्यक्ष राजेश खंडेलवाल, संजय आचलिया, संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन कदम, सुभाष पावडे, पप्पू पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील, बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, सभासद शरद भुयार, सुमित कलंत्री, कमलकिशोर मालाणी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत बिलासपूर, दिल्ली, पटणा, कोलकाता, मुंबई, जालंधर, जम्मू काश्मीर, जबलपूर आदी ठिकाणाच्या महिला हॉकी संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेलो इंडिया स्कू बिलासपूर विरुद्ध साई एनसीओई मुंबई यांच्यातील अत्यंत रोमांचक अशा लढतीत बिलासपूरच्या टिमने विजय प्राप्त केला आहे. तर स्टील प्लांट्स स्पोर्ट बोर्ड दिल्लीचा संघ तिसरा विजेता ठरला आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला चंद्रकुमारजी जाजोदिया, नरेश पाटील व हेमंत काळमेघ, यशोमती ठाकूर आदीकडून रोख रक्कम व ट्राफी देऊन गौरविण्यात आले. यासोबतच उत्कृष्ट गोल किपर म्हणून मुंबईची कोमल हिचा, टॉप स्कोरर म्हणून मुंबईची चैत्रानी दास हिचा तर प्लेयर ऑफ दि टुर्नामेंटचा खिताब दिल्लीची राखी हिला देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे यांनी तर आभार नम्रता पावडे यांनी केले. या कार्यक्रमाला खेळाडू, टीम मॅनेजर, कोच, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.