मुंबई : मध्य रेल्वेने शानदार सांघिक खेळ करताना एमएचएएल अध्यक्षीय एकादश संघाचा २-१ असा पराभव करुन १३व्या गुरु तेग बहादुर सुवर्ण चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजयी कूच केली. अन्य एका सामन्यात दक्षिण मध्य रेल्वेने रोमांचक सामन्यात बाजी मारताना पंजाब पोलीस संघाचा ४-३ असा पाडाव केला.चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या (एमएचएएल) यजमानपदाखाली सुरु असलेल्या या स्पर्धेत मध्य रेल्वेने नियंत्रित खेळ करताना यजमान एमएचएएल अध्यक्षीय एकादशचा पराभव केला. सामन्यातील दोन्ही सत्रात मिळालेल्या प्रत्येकी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मध्य रेल्वेने बाजी मारली. विशेष म्हणजे यजमानांनी आक्रमक सुरुवात करताना सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. सहाव्याच मिनिटाला मयुर पाटीलने शानदार गोल करुन एमएचएएल संघाला आघाडीवर नेले. यानंतर हरमीत सिंगने २३व्या मिनिटावर आणि राजेंद्र सिंगने ६२व्या मिनिटावर मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत मध्य रेल्वेला विजयी केले.अन्य एका सामन्यात दक्षिण मध्य रेल्वे संघाने मोक्याच्यावेळी खेळ करताना पंजाब पोलीस संघाचा ४-३ असा पाडाव केला. रेल्वेने चार पैकी दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर केला, तर पोलिसांनी आपले सगळे गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. गगनदीप सिंगने १९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन रेल्वेला आघाडी मिळवून दिल्यानंतर धरमवीर सिंग आणि हरदीप सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर अनुक्रमे २७ आणि २९व्या मिनिटाला गोल करुन पोलिसांना आघाडीवर नेले.यानंतर, सयद नियाझ व मयांक जेम्स यानी अनुक्रमे ३८व्या व ४८व्या मिनिटाला गोल करुन दक्षिण मध्य रेल्वेला ४-२ असे आघाडीवर नेले. ६८व्या मिनिटाला पोलिसांच्या गुरविंदर सिंगने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत सामना ४-३ असा चुरशीचा केला. रेल्वेने भक्कम बचावाच्या जोरावर सामना जिंकला.>द. मध्यचा धडाकादक्षिण मध्य रेल्वे संघाने ‘अ’ गटात विजयी धडाका कायम राखताना सर्व सामने जिंकले. या जोरावर त्यांनी दिमाखात उपांत्य फेरी गाठली असून त्यांचा सामना ‘ब’ गटातील आर्मी इलेव्हन विरुध्द होईल. दुसरीकडे, पंजाब पोलिसांना पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. उपांत्य सामन्यात त्यांच्यापुढे बलाढ्य ‘ब’ गटातील इंडियन आॅईलचे तगडे आव्हान असेल.
मध्य रेल्वेचा यजमानांना धक्का, १३व्या गुरु तेग बहादुर सुवर्ण चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजयी कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 4:49 AM