ब्रेडा: भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंमित फेरीत धडक मारली आहे. भारतानं यजमान नेदरलँडला बरोबरीत रोखत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. भारत आणि नेदरलँड सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. मात्र अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला ही कामगिरी पुरेशी ठरली. भारतानं दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तब्बल आठवेळा चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या नेदरलँडला भारतानं बरोबरीत रोखलं. या सामन्यात 47 व्या मिनिटाला मनदीप सिंगनं भारताचा पहिला गोल नोंदवला. यानंतर लगेचच 8 मिनिटांनी नेदरलँडच्या थिएरी ब्रिंकमेननं गोल करत यजमानांना बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर भारताचे 8 गुण झाले आहेत. यामुळे भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियानं 10 गुणांसह आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता उद्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जेतेपदासाठी सामना रंगेल. ऑस्ट्रेलियानं तब्बल 14 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. तर भारतीय संघाला दोनदा अंतिम फेरीत धडक मारता आली आहे. त्यामुळे स्पर्धा जिंकण्यासाठी भारताला प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.
Champions Trophy Hockey 2018: नेदरलँडला बरोबरीत रोखत भारताची अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 9:52 PM