ब्रेडा, नेदरलँड : भारताने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला २-१ ने पराभूत करीत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज येथे सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने दोन गोल दुसऱ्या क्वार्टरमध्ये केले. हरमनप्रीतसिंह याने १७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर मनदीप याने २८ व्या मिनिटाला गोल करीत ही आघाडी दुप्पट केली.विश्व रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर असलेला अर्जेंटिनाचा ड्रॅगफ्लिकर गोंजालो पेईलाट याने ३० व्या मिनिटाला एकमेव गोल केला.पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचे स्वप्न पाहत असलेल्या भारताने कालच्या सामन्यात पाकिस्तानला ४-० ने पराभूत केले होते.सहा देशांच्या या स्पर्धेत भारत दोन सामन्यांतील विजयांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. आठ वेळच्या आॅलिम्पिकविजेत्या भारताचा पुढचा सामना विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियासोबत २७ जून रोजी होईल.सामन्याच्या १७ व्या मिनिटाला संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर हरमनप्रीतसिंह याच्या ड्रॅग फ्लिकवर चेंडू अर्जेंटिनाचा गोलकीपर तोमास सँटियागो याच्या पायातून निघून गेला. मध्यंतराच्या दोन मिनिटे आधी मनदीप याने गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.त्यानंतर दोनच मिनिटांत अर्जेंटिनाच्या संघाने गोल करीत आघाडी कमी केली. पेनल्टी कॉर्नरवर पेईलाटचा जोरदार शॉट भारताचा श्रीजेश रोखू शकला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:11 AM