नवी दिल्ली - अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम लढतीत भारतीयहॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा शूटआऊटमध्ये पराभव करत सुलतान जोहर कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. निर्धारित वेळेत सामना १-१ अशा बरोबरीत राहिल्यानंतर सामना शूटआऊटमध्ये पोहोचला शूटआऊटमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ४-३ ने मात केली. सुलताना जोहोर कपमध्ये २१ वर्षांखालील संघ सहभागी होतात. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. याआधी २०१३ आणि २०१४ मध्ये भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
या विजययाबरोबरच भारताच्या ज्युनियर संघाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या भारताच्या पराभवाचा बदला घेतला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या सिनियर संघाने भारताला ७-० अशा गोलफरकाने पराभूत केले होते.
या सामन्यात निर्धारित वेळेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाची गोलसंख्या १-१ अशा बरोबरीत होती. भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर सामन्याच्या पुढच्या ३० मिनिटांमध्ये एकही गोल झाला नाही. त्यानंतर सामना शूटआऊटमध्ये पोहोचला. तिथे भारताने ऑस्ट्रेलियाला ४-३ अशा फरकाने पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले.