भुवनेश्वर : भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी विश्व चषकातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने भारताचा केलेल्या पराभवाचे खापर पंचावर फोडले आहे. ‘सलग दुसऱ्या स्पर्धेत खराब अंपायरिंगमुळे भारताला पदकापासून वंचित रहावे लागले,’ असे ते म्हणाले.नेदरलॅँड्सने भारताचा १-२ असा पराभव केला. त्यानंतर हरेंद्र सिंग यांनी सांगितले की,‘मला समजत नाही की अमित रोहिदास याला दहाव्या मिनिटाला पिवळे कार्ड का दाखवण्यात आले? मनप्रीत याला मागून धक्का मारण्यात आल्यानंतरही डच खेळाडूला कोणतेही कार्ड मिळाले नाही. आम्ही आशियाई स्पर्धेनंतर विश्वचषकात जिंकण्याची संधी खराब अंपायरिंगमुळे गमावली.’हरेंद्र सिंग पुढे म्हणाले की, ‘मी या पराभवासाठी माफी मागतो. मात्र जोपर्यंत पंचांच्या कामगिरीचा स्तर उंचावत नाही तोपर्यंत याच प्रकारच्या परिणामांचा समाना करावा लागेल.’ कर्णधार मनप्रीत सिंह म्हणाला, ‘दोन मोठ्या स्पर्धेत आमच्यासोबत असा प्रकार झाला. लोक आम्हाला विचारतात की विजय का मिळत नाही? आम्ही त्यांना काय उत्तर द्यावे.’हरेंद्र यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या कारकिर्दीत मी विरोध केल्यानंतर कोणतेही परिणाम चांगले आले नाही. आम्ही हा निकाल स्वीकार करतो. मात्र तटस्थ अंपायरिंगची मागणी करत आहोत. पंचाचा एक चुकीचा निर्णय संघाच्या चार-पाच वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवतो.’ ते पुढे म्हणाले की, ‘खेळाडूंनी बरोबरीची लढत दिली. मी त्यांना त्यांच्या कामगिरीचे श्रेय देतो. दोन्ही संघांनी खूपच आक्रमक हॉकी खेळली.’पंचांवरील टीका चुकीची - डच प्रशिक्षकडच प्रशिक्षक मॅक्स कॅलडेस यांनी पंचांच्या कामगिरीवरील टीका चुकीची असल्याचे सांगितले,‘पंचांनी सामना नाही खेळला. आम्ही खेळलो व जिंकलो. पराभवानंतर या प्रकारची चर्चा होते. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत पंचांचा निर्णय आमच्या विरोधात गेला होता. तेव्हा आम्ही भारतासोबत ड्रॉ खेळलो होतो. पंच आपले काम करतात आणि खेळाडू आपले काम करतात.’ डच कर्णधार बिली बाकेर म्हणाला की, ‘आम्हाला पंचांविरोधात कोणतीही तक्रार नाही.’
प्रशिक्षक हरेंद्र यांनी पराभवाचे खापर फोडले पंचांवर; खराब अंपायरिंगमुळे रहावे लागले पदकापासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 4:35 AM