नवी दिल्ली : सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या सरदार सिंगलाच डच्चू देण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली. या संघात सरदार नसल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे, तर उपकर्णधारपद चिंगलेनसना सिंगकडे सोपवण्यात आले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात सरदारबरोबरच रमणदीपलाही वगळण्यात आले आहे. पण अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचे या संघात पुनरागमन झाले आहे. अजलान शाह हॉकी स्पर्धेमध्ये रमणदीपने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला वगळल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ ' ब ' गटात आहे. भारताबरोबर या गटामध्ये पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर 7 एप्रिलला रंगणार आहे.
भारतीय संघ गोलरक्षक - पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा.बचावपटू - रूपिंदर पाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरूण कुमार, कोथाजीत सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास.मध्यरक्षक - : मनप्रीत सिंग ( कर्णधार ), चिंगलेनसना सिंग, सुमित, विवेक सागर प्रसाद.आघाडीपटू - आकाशदीप सिंग, एस. वी. सुनील, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंग.