नवी दिल्ली : स्ट्रायकर मनदीपसिंग पाठोपाठ कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या अन्य पाचही हॉकीपटूंना खबरदारीचा उपाय म्हणून बेंगळुरू येथील इस्पितळात दाखल करण्यात आहे. साईने बुधवारी ही माहिती दिली.मनदीपमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवली नाहीत मात्र आॅक्सिजनचा स्तर खालावला होता. सोमवारी त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. अन्य सहकाऱ्यांनादेखील एसएस स्पर्श मल्टिस्पशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.साईने दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कोरोनाबाधितांना इस्पितळात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार व्हावेत आणि सर्वजण लवकर बरे व्हावे या हेतूने पाऊल उचलण्यात आले आहे. या सहा जणांमध्ये कर्णधार मनप्रीतसिंग, स्ट्रायकर मनदीपसिंग, डिफेन्डर सुरेंदर कुमार आणि जसकरणसिंग, ड्रॅगफ्लिकर वरूण कुमार आणि गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक यांचा समावेश आहे. महिनाभर ब्रेक दिल्यानंतर बेंगळुरूकडे प्रवास करताना हे खेळाडू बाधित झाले असावेत, अशी शंका साईच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. खेळाडूंची दररोज चार वेळा चाचणी घेतली जात आहे. सर्व महिला खेळाडू निगेटिव्ह आढळल्याची माहिती साईने दिली. (वृत्तसंस्था)
CoronaVirus News: कोरोनाबाधित पाचही हॉकीपटू इस्पितळात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:07 AM