लुसाने : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रतिष्ठित प्रो लीगचे दुसरे सत्र वर्षभरासाठी पुढे ढकलले आहे. ही लीग आता जून २०२१ पर्यंत चालेल. कोरोनामुळे क्रीडा आयोजन स्थगित झाल्यामुळे शुक्रवारी हा निर्णय घेतला. दुसऱ्या सत्राचे आयोजन जानेवारी ते जून या कालावधीत होणार होते. कोरोनामुळे आतापर्यंत लीगमधील एकतृतीयांश सामन्यांचे आयोजन होऊ शकले.भारतासह ११ सहभागी देशांसोबत चर्चा केल्यानंतर एफआयएचने हा निर्णय जाहीर केला. भारतीय संघ गुणतालिकेत दोन सामन्यांतील विजयामुळे दहा गुणांसह बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅन्ड यांच्यापाठोपाठ चौथ्या स्थानावर आहे.एफआयएचने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे जगात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व ११ देशांसोबत झालेल्या चर्चेनंतर दुसरे सत्र जून २०२१ पर्यंत लांबीवर टाकण्यात आले आहे.सुरुवातीला १५ एप्रिलपर्यंत आणि नंतर १७ मे पर्यंतचे सामने स्थगित करण्याचा याआधी निर्णय झाला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे जाणवताच आज वर्षभरासाठी सामन्यांचे आयोजन लांबणीवर टाकण्यात आले. यामुळे प्रो लीग हॉकीचे तिसरे सत्र आता सप्टेंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)
CoronaVirus: प्रो लीग हॉकीसत्र एक वर्षासाठी स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 2:41 AM