गोल्ड कोस्ट : पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावल्यामुळं सामना बरोबरीत सुटला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानचा पहिला सामना हा 2-2 असा बरोबरीत सुटला आहे. शेवटच्या क्षणाला भारताने पाकिस्तानकडून पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यामुळे हा सामना बरोबरीत सोडवण्यात आला. या सामन्यात भारताने सुरूवातीपासून 2-0 अशी आघाडी मिळवली होती पण मोक्याच्या क्षणी पाकिस्तानने दोन गोल करत हा सामना बरोबरीत सोडला.
अपेक्षेप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आज झालेल्या सामन्याला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. पहिल्या क्षणांपासून भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानी खेळाडूंनीही भारताला टक्कर दिली. अखेर एस. व्ही. सुनीलने दिलेल्या पासवर नवोदीत दिलप्रीत सिंहने 39 व्या मिनीटाला बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर पाकिस्तानवर दबाव टाकण्याची पुरेपूर संधी भारताकडे उपलब्ध होती, मात्र त्या संधीचा लाभ उठवणं भारतीय खेळाडूंना जमलं नाही. पहिल्या सत्रात भारताने पाकिस्तानवर 2-0 आशी भक्कम आघाडी घेतली होती.
पण दुसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यात भारताचे खेळाडू सपशेल अपयशी ठरले. मध्यंतरीच्या काळात भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या, मात्र भरवशाच्या रुपिंदरपाल सिंहने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली.
अखेरच्या क्षणी तिसऱ्या पंचांनी दोन वादग्रस्त निर्णय देत पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर बहाल केला. या संधीचा फायदा घेत अली मुबाशिरने श्रीजेशला चकवत पाकिस्तानचा दुसरा गोल केला. सामना संपल्यानंतर भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी तिसऱ्या पंचांकडे शेवटच्या दोन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आपला निषेध नोंदवला. मात्र पहिल्याच सामन्यात बरोबरी पदरी पडल्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज निर्माण झालेली आहे.