ढाका : भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा शनिवारी सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत ४-० ने धुव्वा उडवला आणि दहाव्या आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. चारही गोल लढतीच्या दुस-या हाफमध्ये नोंदविल्या गेले. सुपर फोर फेरीत भारतीय संघाने सात गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
या स्पर्धेत साखळी फेरीत भारताने पाकविरुद्ध मोठ्या फरकाने विजय नोंदवला होता. पाकिस्तान संघ सुपर फोरमध्ये भारताला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा होती, पण भारताच्या आघाडीच्या फळीने चमकदार कामगिरी करीत प्रतिस्पर्धी संघाला कुठलीही संधी दिली नाही. ही लढत अनिर्णीत संपली असती तरी भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता. अंतिम फेरीत हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाला दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यापैकी एका संघासोबत लढत द्यावी लागण्याची शक्यता आहे. भारताचा बचाव अभेद्य राहिला. बचावफळीने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले.
पहिल्या हाफमध्ये गोलफलक कोरा राहिल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मध्यंतरानंतर शानदार कामगिरी केली. सतबिर सिंग, हरमनप्रीत सिंग, ललित उपाध्याय व गुरजंत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.