भुवनेश्वर : भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, असे मत हॉकी विश्व लीगमध्ये कांस्यपदक पटकाविणा-या भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी व्यक्त केले.साखळी फेरीत एकही सामना न जिंकणाºया भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत तगड्या बेल्जियम संघाचा सडन डेथमध्ये पराभव केला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्ये मात्र ते अर्जेंटिनाकडून एका गोलने पराभूत झाले. त्यानंतर कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ११ खेळाडूंसह उतरलेल्या जर्मनीचा भारताने पराभव केला. भारताच्या या कामगिरीवर मारिन यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, या संघासोबत मी आशिया चषकात होतो. मोठ्या पातळीवरची ही माझी पहिलीच स्पर्धा होती. मी प्रदशर्नावर खुश आहे; पण कामगिरीत सातत्य गरजेचे वाटते. संघाच्या मजबूत आणि कमकुवत बाजूंची कल्पना आली आहे. त्यानुसार आता पुढील रणनीती आखावी लागेल. भारतीय संघाने दोन्ही स्पर्धांत पदक जिंकले आहे याचे श्रेय मात्र त्यांनी स्वत: घेतले नाही. यशाचे श्रेय ते खेळाडूंना देतात. ‘कोच म्हणून दोन स्पर्धांत पदक मिळवणे ही चांगली गोष्ट आहे; पण ही केवळ सुरुवात आहे. खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे ठरते. मी प्रत्येकवेळी संघाबाबत बोलतो. वैयक्तिक कामगिरीबाबत नाही. आम्ही जगातील कोणत्याही संघाविरुद्ध खेळू शकतो आणि खेळाडूंचाच विश्वास आहे की ते कोणत्याही संघाला हरवू शकतात. हे चांगले संकेत आहेत. भारतीय संघात ७ ज्युनियर खेळाडू आहेत, ज्यांनी अव्वल संघांविरुद्ध खेळ केला. अशा संघाने कांस्यपदक जिंकून दिले यावर अभिमान असायला हवा, हेही मारिन यांनी नमूद केले.
सातत्यासाठी मेहनतीची गरज, संघाच्या कामगिरीवर मी समाधानी - शोर्ड मारिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 6:41 AM