भारतीयहॉकी संघानं प्रो लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नेदरलँड्सला हार मानण्यास भाग पाडले. टीम इंडियानं शनिवारी 5-2 अशा दणदणीत विजयाची नोंद केली होती. पण, डबर हेडर सामन्यातील दुसऱ्या लढतीत नेदरलँड्सकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात टीम इंडियानं 7-4 ( 3-3) असा दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या गोलरक्षकान पी आर श्रीजेशनं या विजयात मोलाची भूमिका बजावली.
शनिवारी झालेल्या सामन्यात गुरजंत, मनदीप आणि ललित यांनी प्रत्येकी एक गोल केले होते, तर रुपिंदर पाल सिंगनं दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आजच्या लढतीतही भारतानं 1-3 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना सामना 3-3 बरोबरीत सोडवला.
नेदरलँडकडून व्हॅन डेर वीर्डेननं 23व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्याला भारताकडून 25व्या मिनिटाला प्रत्युत्तर मिळालं. ललित उपाध्यायनं भारताला बरोबरी मिळवून दिली. पण, पुढच्याच मिनिटाला नेदरलँड्सनं आघाडी घेतली. 26 व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरनं, तर 27 व्या मिनिटाला केलर्मन यांनी गोलं करताना नेदरलँड्सला 3-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. भारताकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु त्यांना तिसऱ्या सत्रापर्यंत यश मिळाले नाही. अखेरच्या सत्रात मनदीप सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी अनुक्रमे 51 व 55 व्या मिनिटाला गोल करताना सामना बरोबरीत आणला.
त्यानंतर शूटआऊटमध्ये भारतानं 3-1 अशी बाजी मारताना सामना 7-4 असा जिंकला.