लंडन - आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या भारतीय महिला संघाला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात B गटात यजमान इंग्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या 53व्या मिनिटाला इंग्लंडच्या लिली ओस्लीने बरोबरीचा गोल केला आणि 2876 दिवसांनंतरही विश्वचषक स्पर्धेतील भारताची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताकडून नेहा गोयलने एकमेव गोल नोंदवला. भारतीय महिलांनी 5 सप्टेंबर 2010 मध्ये जपानवर 2-0 असा विजय मिळवला होता आणि त्यानंतर या स्पर्धेत त्यांना शनिवारी विजय मिळवण्याची संधी होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन खेळ करताना भारतीय खेळाडूंनी पंधरा मिनिटांच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला मार्किंगचा डाव खेळला. भारतीय आक्रमणपटूंनी प्रतिस्पर्धीच्या क्षेत्रावर सातत्याने चढाई केली. त्यामुळे इंग्लंडला बचावावर अधिक भर द्यावा लागला. 8व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर इंग्लंडला गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी काऊंटर अटॅकचा सुरेख खेळ केला. पण, कोणालाही गोल करता आला नाही. दुस-या सत्रात भारतीयांचा खेळ मंदावलेला जाणवला, परंतु त्यांनी इंग्लंडच्या बचावफळीला व्यग्र ठेवले. इंग्लंडचा सामन्यातील तिसरा कॉर्नरचा प्रयत्न भारताची गोलरक्षक सविताने सुरेख पद्धतीने रोखला. 22 व्या मिनिटाला इंग्लंडला पुन्हा कॉर्नर मिळाला. यावेळी त्यांनी थेट आक्रमण न करता रणनिती बदलली. गोलपोस्ट जवळ उभ्या असलेल्या खेळाडूकडे तो चेंडू सोपवण्यात आला, परंतु सविताने त्वरित झेप घेत अप्रतिमरित्या तो अडवला. सविताच्या या कामगिरीने मनोबल उंचावलेल्या भारतीय खेळाडूंनी अचानक आक्रमण सुरू केले. 25 व्या मिनिटाला त्यांना कॉर्नर मिळाला. निक्की प्रधानने टोलावलेला चेंडू इंग्लंडच्या हॅना मार्टिनच्या पायावर लागल्याने त्यावर थेट गोल करण्याची संधी भारताने गमावली. मात्र, नवज्योत कौरने चेंडूवर त्वरित ताबा मिळवताना इंग्लंडच्या खेळाडूंना चकवून चेंडू नेहा गोयलकडे सुपूर्द केला. नेहाने कोणतीच चूक न करता चेंडू सहज गोलजाळीत धाडला. त्या जोरावर भारताने मध्यंतराला 1-0 अशी आघाडी घेतली.पहिल्या दोन सत्रात भारताने तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ केला. मध्यंतरानंतर भारताने त्याच जोशात खेळ पुढे नेला. भारतीय खेळाडूंनी सातत्याने इंग्लंडच्या D क्षेत्रावर आक्रमण केले. इंग्लंडनेही पलटवार केला, परंतु सविताने त्यांना यश मिळू दिले नाही. तिस-या सत्रातही भारताने 1-0 अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले. अखेरच्या सत्रात इंग्लंडचे खेळाडू दबावाखाली दिसले. त्यात मिळालेल्या कॉर्नरवर गोल करण्यात अपयश येत असल्याने त्यांच्यावरील दडपण वाढले. 53व्या मिनिटाला सविताने चोख बचाव करूनही दीपिकाच्या एका चुकीने इंग्लंडला गोल करण्याची संधी मिळाली. त्यावर लिली ओस्लीने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर इंग्लंडकडून वेळ काढू खेळ झाला आणि भारताला बरोबरीवरच समाधान मानावे लागले.