लंडन - कर्णधार राणी रामपालच्या अप्रतिम गोलच्या जोरावर भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 असे बरोबरीत रोखले. या निकालासह भारताने स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आणि ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा कायम राखल्या आहेत. भारताला क्रॉस ओव्हर लढतीत इटलीचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय महिलांनी सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या इंग्लंडला झुंजवले होते. मात्र, अखेरच्या क्षणाला इंग्लंडने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. ब गटातील दुस-या लढतीत आयर्लंडने 1-0 अशा फरकाने भारताला पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाची उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवण्याची संधी हुकली होती.
चार गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत, तर अन्य चार जागांसाठी क्रॉस ओव्हर सामने होणार आहेत. भारताने रविवारी B गटातील अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य अमेरिकेला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले आणि गोल सरासरीच्या जोरावर बाद फेरीत प्रवेश केला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला आता जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या इटलीचा सामना करावा लागणार आहे. ही लढत जिंकल्यास भारताची गाठ पुन्हा आयर्लंडशी होणार असून साखळीतील पराभवाची परतफेड त्यांना करता येणार आहे.
सामन्याची वेळ- मंगळवारी रात्री 10.30 वा.