लंडन - भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 अशा बरोबरीत रोखले. या निकालासह भारतीय महिलांनी गोल सरासरीच्या जोरावर विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
भारतीय महिलांनी सुरूवात तर आत्मविश्वासाने केली, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. पहिल्या सत्रातील 20 मिनिटांत मिळालेल्या चार पेनल्टी कॉर्नरवर भारतीय महिलांना गोल करता आला नाही. आक्रमणपटू नवनीत कौर पेनल्टी कॉर्नरवरून चेंडू इतक्या संथ गतीने पास करत होती, की अमेरिकेच्या गोलरक्षक जॅकी ब्रिग्जला चेंडूचा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. पाय मुरगळल्यामुळे तिस-याच मिनिटाला कर्णधार राणी रामपालला मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर भारताच्या आक्रमणाची धार बोथट झाली.
11 व्या मिनिटाला पॉलिनो मार्गोक्सने मैदानी गोल करून अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 15 व्या मिनिटाला राणी मैदानावर परतली. मात्र, पिछाडीवर पडलेल्या भारतीय खेळाडूंना पुनरागमन करता आलेच नाही. 18 व्या मिनिटाला उदिताने चालून आलेली संधी गमावली. गोलपोस्ट समोर असलेल्या उदीताला केवळ चेंडूला दिशा द्यायची होती आणि तेही तिला करता आले नाही. पहिल्या सत्रातील भारतीय महिलांचा खेळ आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने साजेसा झालेला नाही. गोलरक्षक सविताने पुन्हा एकदा काही अप्रतिम बचाव केले.