लंडन - जागतिक क्रमवारीत पिछाडीवर असलेल्या आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय महिला संघाचे हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आव्हान खडतर झाले आहे. भारतीय महिला संघाला बाद फेरीतील आशा कायम राखण्यासाठी रविवारी होणा-या सामन्यात अमेरिकेविरूद्ध सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताला या सामन्यात बरोबरीही पुरेशी ठरणारी आहे.
भारतीय महिलांनी सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या इंग्लंडला झुंजवले होते. मात्र, अखेरच्या क्षणाला इंग्लंडने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. ब गटातील दुस-या लढतीत आयर्लंडने 1-0 अशा फरकाने भारताला पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाची उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवण्याची संधी हुकली.
चार गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत, तर अन्य चार जागांसाठी प्रत्येक गटातील दुस-या व तिस-या स्थानातील संघ एकमेकांशी भिडणार आहेत. भारतीय संघ गटात सध्या तिस-या स्थानावर आहे. अमेरिका आणि भारत यांचे समसमान गुण आहेत. मात्र, गोलफरकाने भारत आघाडीवर आहे आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेविरूद्ध बरोबरीही पुरेशी आहे.