सेऊल - भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवित शुक्रवारी द. कोरियावर ३-१ ने विजय साजरा करीत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी संपादन केली. पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी खेळला जाईल.भारताची आघाडीची खेळाडू गुरजीत कौर (दुसºया मिनिटाला) तसेच दीपिका (१४ मिनिट) यांनी भारताला आघाडी मिळवून दिली. पूनम राणीने ४७ व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदविला. यजमान संघाकडून मी हून पार्क हिने ५७ व्या मिनिटाला गोल नोंदवित पराभवाचे अंतर कमी केले.सामन्याच्या सुरुवातीला भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्धी बचाव फळीवर वारंवार दडपण आणले. दुसºया मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला, त्यावर गुरजीतने अलगद गोल केला. द. कोरियालादेखील चौथ्या मिनिटाला बरोबरीची संधी होती. पण पेनल्टी कॉर्नरवर मारलेला फटका गोलफळीच्या बाहेर गेला. भारताची गोलकिपर स्वाती हिने दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरची आणखी एक संधी निष्फळ ठरविली. दुसरीकडे १४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाने गोल केला.दुसºया क्वॉर्टरमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध चांगलेच झुंजले, पण कुणालाही गोल नोंदविता आला नाही. तिसºया क्वॉर्टरमध्ये यजमान संघाने बरोबरीचे प्रयत्न केले पण भारतीय खेळाडूंनी तिसरा गोल नोंदविला. वंदना कटारियाच्या पासवर पूनमने हा गोल नोंदविला. (वृत्तसंस्था)पहिल्या क्वॉर्टरमध्ये भारताची आघाडीजागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या भारताने पहिल्याच क्वॉर्टरमध्ये मोठी आघाडी घेतली. भारताच्या गुरजीत कौर आणि दीपिका यांनी दमदार खेळ करत पहिल्या क्वॉर्टरच्या शेवटी २ -० अशी आघाडी मिळवून दिली.
पाच सामन्यांची हॉकी मालिका : भारतीय महिलांचा द.कोरियावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:16 AM