इंचियोन - कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी आणि गुरजीत कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा ३-२ गोलने पराभव केला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत टीम ब्लूने २-० अशी महत्त्वपूृण आघाडी घेतली.भारतीय महिलांनी सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक आणि नियोजनपूर्वक खेळ केला. पूनम राणीला सामन्याच्या ८ व्या मिनिटालाच गोल करण्याची संधी मिळाली. तिने केणतीही चूक न करता चेंडू कोरियाच्या गोलमध्ये टाकून आपल्या संघाला १-० गोलने आघाडी मिळवून दिली. पण, या आघाडीचा आनंद भारतीय महिलांना जास्त वेळ घेता आला नाही. कोरियाच्या यूरिम ली ने १० व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. नंतर भारतीय आघाडीच्या फळीच्या महिलांनी दोन आक्रमने केली; पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. २७ व्या मिनिटाला कोरियाविरुद्ध आखलेली एक चाल यशस्वी झाली आणि कर्णधार राणी रामपालने कोणतीही चूक न करता गोल करून संघाला २-१ अशी आघाडी दिली. तिसºया क्वॉटरच्या सुरुवातीलाच कोरियाच्या जुनगेयून सेओने आपल्या संघाचा दुसरा गोल करून २-२ अशी बरोबरी साधून दिली; पण लगेचच एकच मिनिटानंतर भारतीय संघाला पेनल्टी मिळाली. यावेळी गुरजीत कौरने कोणतीही चूक न करता चेंडू गोलमध्ये टाकत संघाला ३-२ गोल अशी निर्णायक आघाडी मिळून दिली. ही आघाडी भारतीय महिलांनी शेवटपर्यंत राखत सामना जिंकला. या मालिकेतील तिसरा सामना ८ मार्च रोजी होणार आहे. (वृत्तसंस्था)
मैत्रीपूर्ण हॉकी मालिका : भारतीय महिलांचा दक्षिण कोरियावर सलग दुसरा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 2:21 AM