भुवनेश्वर : गतविजेत्या भारतापुढे एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी सहावेळेचा चॅम्पियन जर्मनीचे कडवे आव्हान असेल. विजयासाठी भारतीय संघातील बचावफळी आणि ड्रॅग फ्लिकर खेळाडू यांना मेहनत घ्यावी लागेल.स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सकडून ४-५ने पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारताने पुढचे तीनही सामने शानदार कामगिरीच्या बळावर जिंकून सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने उपांत्यपूर्व सामन्यात काल बेल्जियमचा १-० ने पराभव केला. यशदीप सिवाच, उपकर्णधार संजय कुमार आणि शारदानंद तिवारी यांच्या बचावफळीने सामन्यात शानदार कामगिरी केली. भारताचे दोन्ही गोलकीपर प्रशांत चौहान आणि पवन यांनी बेल्जियमचे अनेक हल्ले परतवून लावले होते. संजय, तिवारी, अरिजित हुंडल आणि अभिषेक लाक्रा हे चार पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ आहेत. संजयने फ्रान्स आणि पोलंडविरुद्ध पाठोपाठ हॅटट्रिक नोंदविली. भारतीय संघाचे मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी आमचे खेळाडू शांतचित्त खेळत असून त्यांचे थंड डोक्याने खेळणे हेच यशाचे गमक असल्याचे म्हटले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या भारतीय संघाचा खेळाडू राहिलेला विवेक सागर प्रसाद हा संघाचा कर्णधार आहे. तो मधली फळी सांभाळतो. जर्मनीची नजरदेखील आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याकडे असेल. २०१३ ला नवी दिल्लीत हा संघ विजेता ठरला होता. २०१६ ला लखनौमध्ये संघाने कांस्य पदक जिंकले. ‘जर्मनीला आम्ही कमकुवत मानणार नाही. मोठ्या स्तरावर हा संघ मुसंडी मारण्यात तरबेज मानला जातो,’ अशी कबुली रीड यांनी दिली.
हॉकीवर ५ वर्षांत ६५ कोटी खर्च! : भारत सरकारने राष्ट्रीय पुरुष हाॅकी (सिनियर आणि ज्युनियर) संघावर ५ वर्षांत ६५ कोटी रुपये खर्च केला. अशी माहिती क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.