नवी दिल्ली : स्पेन दौरा युवा खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुवर्ण संधी असेल, असे मत महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने संघात झालेले तांत्रिक बदलही तपासणे शक्य होणार असल्याचे राणी म्हणाली. भारताचा २० सदस्यांचा संघ शनिवारी स्पेनकडे रवाना झाला.राणीच्या नेतृत्वाखालील संघ स्पेनविरुद्ध पाच सामने खेळणार असून पहिला सामना १२ जून रोजी माद्रिदमध्ये होईल. राणी म्हणाली, ‘युवा खेळाडूंनी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत शानदार कामगिरी केली. तीच लय कायम राखल्यास लंडनमध्ये होणाºया विश्वचषकात युवा खेळाडू संघात स्थान मिळवू शकतील.’ जुलैमध्ये विश्वचषकाचे आयोजन होईल. त्यानंतर आॅगस्टमध्ये आशियाडचे आयोजन जकार्ता येथे होणार आहे. या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर खेळात नवे बदल घडवून आणण्याची ही अखेरची संधी असल्याचे मत राणीने व्यक्त केले.‘ आम्ही आठ वर्षानंतर विश्वचषक खेळत आहोत. सर्वांसाठी ही मोठी संधी तर अनेकांसाठी हा पहिलाच अनुभव असेल. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर आता आम्हाला कुणी ‘अंडरडॉग’ मानणार नाही. विश्वचषकातील कामगिरीचा प्रभाव आशियाडमध्ये पडणार आहे. त्यासाठीच स्पेनचा दौरा सर्व प्रकारच्या प्रयोगांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विश्वचषकापूर्वी ताजेतवाने राहणे गरजेचे आहे. २० खेळाडू असल्याचे रोटेशननुसार संधी देण्याचा कोचपुढे पर्याय उपलब्ध असेल, असे राणीने सांगितले.(वृत्तसंस्था)
स्पेन दौरा युवा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी : राणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 3:20 AM