मुंबई : भारतीय हॉकी संघाच्या कोचपदी हरेंद्रसिंग यांची नियुक्ती हे चांगले पाऊल असल्याचे सांगून आशियाड आणि अन्य स्पर्धांसाठी संघाची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने मात्र नव्या कोचकडे पुरेसा वेळच नसल्याचे माजी कोच जोकिम कार्वाल्हो यांनी म्हटले आहे.हॉकी इंडियाने महिला हॉकीचे प्रशिक्षकपद मारिन शोर्ड यांच्याकडे तर पुरुष हॉकीचे प्रशिक्षकपद हरेंद्रसिंग यांच्याकडे सोपविले आहे. यावर प्रतिक्रिया विचारताच कार्वाल्हो म्हणाले,‘हरेंद्र यांची नियुक्ती हे चांगले पाऊल आहे. आधुनिक हॉकीची त्यांना इत्थंभूत माहिती आहे. एकच उणीव आहे ती ही की आशियाड आणि अन्य स्पर्धांसाठी संघ सज्ज करायला त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. ’ भारताला जकार्ता येथे आशियाड आणि नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे विश्व चषक खेळायचा आहे. जर्मनीचे उदाहरण देत कार्वाल्हो म्हणाले,‘ज्युनियर कोचला सिनियर संघाच्या कोचपदाची जबाबदारी सपविणे योग्य आहे कारण सिनियर संघात अधिकाधिक ज्युनियर्सचा भरणा आहे. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनात ज्युनियर विश्वचषक जिंकला. अनेक वर्षांपासून ते कोचिंगमध्ये आहेत. ज्युनियर विश्वचषकानंतरच त्यांना सिनियर संघाची जबाबदारी सोपवायला हवी होती. तेव्हा हा निर्णय झाला असता तर हरेंद्र यांच्याकडे संघ सज्ज करण्यास पुरेसा वेळ असता.’ (वृत्तसंस्था)मारिन यांच्याकडे महिला संघाची धुरा सोपविण्यापेक्षा त्यांची गच्छंती व्हायला हवी होती, असे मत कार्वाल्हो यांनी व्यक्त केले.
हॉकीचे भाग्य बदलण्यासाठी हरेंद्र यांच्याकडे वेळेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:44 AM