नवी दिल्ली, दि. 2 - आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक प्रदर्शनाची दखल घेत हॉकी इंडियाने शनिवारी रोलंट ओल्टमंस यांना मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवले. हॉकी इंडियाच्या हाय परफॉर्मन्स आणि डेव्हलपमेंट समितीने तीन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज ओल्टमंस यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. ओल्टमंस यांच्याजागी योग्य व्यक्तीची निवड होईपर्यंत परफॉर्मन्स समितीचे संचालक डेव्हीड जॉन प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळणार आहेत.
ओल्टमंस यांच्या कामगिरीवर फेडरेशनचे वरिष्ठ पदाधिकारी फारसे खूष नव्हते. मुख्य प्रशिक्षक या नात्याने ओल्टमंस यांनी संघाची तंदुरुस्ती आणि अऩ्य बाबींमध्ये सुधारणा घडवून आणल्याबद्दल हॉकी इंडियाने त्यांचे कौतुकही केले आहे. पण संघाच्या कामगिरीत सातत्य नव्हते. या तीन दिवसीय बैठकीला एकूण 24 सदस्यांनी उपस्थिती नोंदवली. भारतीय हॉकीच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली.
2016-17 सालातील भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीवर आम्ही समाधानी नव्हतो. आशियामध्ये विजय हा यशाचा मापदंड होऊ शकत नाही असे हॉकी इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष हरबिंदर सिंग यांनी सांगितले. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आमची कामगिरी चांगली असली पाहिजे. मागच्या दोनवर्षात यशामध्ये सातत्य नव्हते. चांगले निकाल आणि उज्वल भवितव्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक होते.
सध्याच्या प्रशिक्षकांच्या कार्यकाळात एका मर्यादेपलीकडे निकाल मिळत नव्हते. त्यामुळे समितीने एकमताने प्रशिक्षकबदलाचा निर्णय घेतला. 2018 च्या स्पर्धा, आशियाई स्पर्धा, वर्ल्डकप, 2020 ऑलिम्पिक लक्षात घेता हा बदल करण्यात आल्याचे हरबिंदर सिंग यांनी सांगितले.