पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने येणारे अपयश भारतीय हॉकी संघाला पुन्हा महागात पडले. चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. कॉर्नर पाठोपाठ पेनल्टी शूटआऊट मध्येही भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने ३-१(१-१) असा विजय मिळवत जेतेपद राखले.
सामन्यात सर्वाधिक कॉर्नर मिळूनही समन्वयातील गफलतीमुळे भारतीय खेळाडूंना पहिल्या तीन सत्रात एकही गोल करता आला नाही. याउलट ऑस्ट्रेलियाने पहिल्याच कॉर्नरवर अचूक गोल करून २४ व्या मिनिटाला आघाडी घेतली. ब्लॅक गोव्हर्सने टोलावलेला तो चेंडू गोलरक्षक पी आर श्रीजेशला अडवता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मध्यंतराला १-० अशी आघाडी घेतली होती.
भारताने त्यानंतर बचावातील त्रूटी त्वरीत दूर करताना ऑस्ट्रेलियाला गोल खात्यात अधिक भर करण्यापासून रोखले. श्रीजेशने पुन्हा एकदा काही अप्रतिम बचाव केले. भारतीय खेळाडूंनी आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना ऑस्ट्रेलियाच्या बचावक्षेत्रात चढाई केली. ४२ व्या मिनिटाला भारताला त्यांचा बचाव भेदण्यात यश आले. चिंग्लेनसानाच्या पासवर विवेक सागरने भारतासाठी बरोबरीचा गोल केला.
त्यामुळे पेनल्टी शूटआऊट घेण्यात आली. त्यातही भारताकडून सुरुवातीचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, श्रीजेशने दोन अप्रतिम बचाव करत सामना रोमांचक अवस्थेत कायम ठेवला. परंतु ऑस्ट्रेलियाने ३-१(१-१) अशी बाजी मारली.