ब्रेडा, नेदरलँड्स : भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी यजमान नेदरलँड्सविरुद्ध शनिवारी येथे किमान बरोबरी राखण्याची गरज आहे. आठ वेळचा आॅलिम्पिक विजेता भारतीय संघ बरोबरी साधू शकला किंवा विजय मिळवू शकला तर सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचेल.
भारत दोन विजय, एक पराभव आणि एका बरोबरीने गुण तक्त्यात दुसºया स्थानावर आहे. गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे १० गुण आहेत. आॅस्ट्रेलियाने या आधीच अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. सहा देशांच्या स्पर्धेत पहिल्या दोन स्थानांवर राहणारे संघ अंतिम फेरीत पोहचतात. भारताच्या उलट नेदरलँड्सला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी हा सामना जिंकण्याची गरज आहे. एका अन्य सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ अर्जेंटिनाशी भिडेल. या सामन्याच्या आधीच अर्जेंटिना स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात बेल्जियमविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. भारताने या आधी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला ४-० असे पराभूत केले होते. या धमाकेदार विजयानंतर भारतीयांनी अर्जेंटिनाला २ -१ ने पराभूत केले होते. मात्र आॅस्ट्रेलियाकडून २-३ने पराभव पत्करावा लागल्याने भारताच्या विजयी वाटचालीला ब्रेक लागला होता.