नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली. त्यामुळे आता संघाचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक पटकावेल, असे मत संघाचा ड्रग फ्लिकर रुपिंदरपाल सिंगने व्यक्त केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली होती. रुपिंदरने या तीन सामन्यांमध्ये चार गोल केले होते. हाच फॉर्म यापुढेही कायम राहील आणि त्याचा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला फायदा हईल, असे रुपिंदरला वाटते.
" न्यूझीलंडने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. पण आम्ही तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये त्यांच्याविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्यामुळे संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. या गोष्टीचा फायदा आम्हाला आशियाई स्पर्धेत होईल. जर आम्ही रणनीतीची योग्य अंमलबजावणी करू शकलो तर आशियाई स्पर्धेत आम्ही नक्कीच सुवर्णपदक जिंकू शकतो, " असे रुपिंदरने सांगितले.