नवी दिल्ली - मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल.हॉकी इंडियाने बुधवारी १८ सदस्यांचा संघ जाहीर केला असून, १८ आॅक्टोबरपासून स्पर्धेचे आयोजन होणार आहे. भारतीय संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरणार असून, २०१६ मध्ये मलेशियातील कौंटन येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ३-२ ने पराभव केला होता. चिग्लेनसानासिंग याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले. गोलकीपर म्हणून श्रीजेशसह युवा कृष्ण बहादूर पाठक याचीही संघात निवड झाली आहे. बचाव फळीत कोथाजितसिंग याचे पुनरागमन झाले. हरमनप्रीत, गुरिंदरसिंग, वरुण कुमार, सुरेंद्र कुमार आणि जर्मनप्रीतसिंग यांचा समावेश असलेल्या बचाव फळीत २० वर्षांचा हार्दिकसिंगला पहिल्यांदा स्थान मिळाले.यंदा अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला मनप्रीत मधल्या फळीत चिग्लेनसानासिंग याच्यासोबत असेल. भारतीय संघ तीन आठवडे भुवनेश्वर येथे सराव करणार आहे. त्यानंतर संघ स्पर्धेसाठी रवाना होईल. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताला स्पर्धेत मलेशिया, पाकिस्तान, द. कोरिया,जपान आणि यजमान ओमानविरुद्ध राऊंडरॉबिन सामने खेळावे लागतील.‘१८ सदस्यांच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. विश्व चषकाआधी काही खेळाडूंना पारखण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आशियाडमधील कटू अनुभव विसरून आमचे खेळाडू डावपेचानुसार खेळतील आणि ओमानमध्ये पुन्हा विजेते होतील, असा विश्वास आहे,’ असे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)भारतीय हॉकी संघगोलकीपर : पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. बचाव फळी : हरमनप्रीत सिंग, गुरिंदरसिंग, वरुण कुमार, कोथाजितसिंग, सुरेंद्र कुमार, जर्मनप्रीतसिंग, हार्दिकसिंग. मधली फळी : मनप्रीतसिंग (कर्णधार), सुमित नीलकांत शर्मा, ललित कुमार उपाध्याय, चिग्लेनसानासिंग, (उपकर्णधार). आक्रमक फळी : आकाशदीपसिंग, गुरजंतसिंग, मंदीपसिंग आणि दिलप्रीतसिंग.
हॉकी : मनप्रीतकडे भारताची धुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:50 AM