चंदीगड : महान हॉकीपटू आणि तीनवेळेचे आॅलिम्पिक सुवर्ण विजेते बलबीरसिंग सिनियर यांना मंगळवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे त्यांची स्थिती चिंताजनक आहे.९६ वर्षांचे बलबीर यांना सध्या मोहालीच्या फोर्टिस इस्पितळात अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे नातू कबीरसिंग भोमिया यांनी आज सकाळी ९ च्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसल्याचे सांगितले. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने शुक्रवारी येथे दाखल करण्यात आले होते. पुढील २४ ते ४८ तास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल, असे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले. याआधी न्यूमोनियामुळे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात १०८ दिवस घालवल्यानंतर जानेवारीत त्यांना सुटी मिळाली होती.लंडन, हेलसिंकी, आणि मेलबोर्न आॅलिम्पिकमध्ये सुवर्णविजेत्या भारतीय संघासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये नेदरलॅन्डवर मिळविलेल्या ६-१ अशा विजयात त्यांनी विक्रमी ५ गोल नोंदविले होते. १९७५ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे ते व्यवस्थापक होते. (वृत्तसंस्था)
हॉकीपटू बलबीर सिनियर अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:01 AM