नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाची स्टार खेळाडू राणी रामपाल हिच्या नावाने रायबरेली येथे स्टेडियम उभारण्यात आले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे असा मान मिळवणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. एमसीएफ रायबरेली स्टेडियमचे नाव आता 'राणीस् गर्ल्स हॉकी टर्फ' असे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर राणीने काही फोटो पोस्ट केले असून, यामध्ये ती नवोदित खेळाडूंशी संवाद साधतानाच स्टेडियमचे उद्घाटन करतानाही दिसत आहे. याबाबत राणीने ट्वीट केले की, 'मी माझा आनंद शब्दांत व्यक्त नाही करू शकत. एमसीएफ रायबरेली हॉकी स्टेडियमचे नाव माझे खेळातील योगदान लक्षात घेऊन राणीस् गर्ल्स हॉकी टर्फ, असे ठेवण्यात आले आहे.
हा माझ्यासाठी भावनिक आणि गर्वाचा क्षण आहे. स्वत:च्या नावाने हॉकी स्टेडियम असलेली मी पहिली हॉकीपटू आहे. ही बाब मी भारतीय महिला हॉकीला समर्पित करते आणि आशा करते की, ही गोष्ट पुढील पिढीला प्रेरित करेल.'