राउरकेला : दक्षिण आफ्रिका दाैऱ्यात भारतीय हॉकी संघाला मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा लाभ झाला. संघात एकतेची भावना आणखी घट्ट झाल्याचे मत कर्णधार हरमनप्रीतसिंग याने व्यक्त केले. भारताने चार देशांच्या मालिकेसाठी द. आफ्रिका दौरा केला होता. दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध विजय मिळविला. फ्रान्सविरुद्ध एक विजय मिळाला तर एक सामना अनिर्णीत राहिला. नेदरलॅन्ड्सविरुद्ध मात्र भारत पराभूत झाला होता. रविवारी एफआयएच प्रो लीग हॉकीच्या स्थानिक टप्प्यात आयर्लंडविरुद्ध ४-० ने विजय नोंदवून भारताने नेदरलॅन्ड्स आणि ऑस्ट्रेलियापाठोपाठ गुणतालिकेत तिसरे स्थान मिळविले.
हरमनच्या वक्तव्याशी सहमत असलेला उपकर्णधार हार्दिकसिंग म्हणाला, ‘माझ्या मते, आम्ही भुवनेश्वर आणि राउरकेला येथे सामन्यागणीक कामगिरीत सुधारणा केली. आमच्या बचावात लक्षणीय प्रगती झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्व सामने महत्त्वपूर्ण होते. यापुढे कामगिरीत आणखी काय सुधारणा व्हायला हवी, याचा अभ्यास करणार आहोत.’
भारतीय पुरुष हॉकी संघ आता २२ मेपासून बेल्जियमचा दौरा करेल. तेथे यजमान संघ आणि अर्जेंटिनाविरुद्ध प्रो लीग सामने खेळणार असून १ जूनपासून लंडनमध्ये जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळणार आहे.
म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीवर भर दिला. जगातील अनेक बलाढ्य संघांविरुद्ध आव्हानांवर मात करीत खेळ केला.’ प्रो लीगमध्ये भारताने भुवनेश्वरमध्ये स्पेनवर ४-१ ने विजय नोंदविला. त्यानंतर नेदरलॅन्ड्सला पेनल्टी शूटआउटमध्येही ४-२ ने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या सामन्यात ४-६ असा पराभव पत्करल्यानंतर राउरकेलाला रवाना होण्याआधी आयर्लंडला १-० ने नमविले.