ठळक मुद्देअर्जेंटिनाची विजयी सलामी, स्पेनवर मातऑगस्टीन मॅझील्लीला सामनावीराचा पुरस्कारजय-पराजयाची आकडेवारी 3-3 अशा बरोबरीत
भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : अर्जेंटिना आणि स्पेन हे हॉकीतील दोन चिवट संघ गुरुवारी हॉकी विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले होते. दोन्ही संघांत अपेक्षेप्रमाणे चुरशीचा खेळ झाला. अर्जेंटिनाच्या बचावाला स्पेनकडून चोख प्रत्युत्तर मिळाले, परंतु अर्जेंटिनाने अनुभवाच्या जोरावर 'A' गटातील पहिल्याच सामन्या 4-3 अशी बाजी मारली. अर्जेंटिनाच्या ऑगस्टीन मॅझील्लीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील जय-पराजयाच्या आकडेवारीत स्पेन 3-2 असा आघाडीवर होता. उभय संघांमध्ये झालेल्या सात सामन्यांत दोन सामने अनिर्णीत सुटले. त्यामुळे याही सामन्यात स्पेनचे पारडे जड मानले जात होते. मात्र, मागील विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या अर्जेंटिनाने सरस खेळ केला. सामन्यात पहिल्या पंधरा मिनिटांत पाच गोल झाले. त्यात अर्जेंटिनाने तीन, तर स्पेनने दोन गोल केले. तिसऱ्याच मिनिटाला एन्रीक गोंझालेज डी कॅस्टेजोन याने स्पेनला आघाडी मिळवून दिली, परंतु पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाकडून सुरेख मैदानी गोल झाला. ऑगस्टीन मॅझील्लीने हा गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पहिल्या सत्रातील 14 व्या मिनिटाला पेरे रोमेऊने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाने खेळ उंचावला आणि मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर संधी साधली. ऑगस्टीन व गोंझालो पेईलट यांनी 15 व्या मिनिटात लागोपाठ मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनाला 3-2 असे आघाडीवर आणले.दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी सावध खेळ केला. 35 व्या मिनिटाला व्हिसेंस रुईजने स्पेनसाठी बरोबरीचा गोल केला. मात्र, 49 व्या मिनिटाला गोंझालोने अर्जेंटिनासाठी केलेला गोल विजयी ठरला. अर्जेंटिनाने शेवटच्या दहा मिनिटांत बचावात्मक खेळ करून सामना जिंकला.