ठळक मुद्देकॅनडा-आफ्रिका सामना 1-1 बरोबरीतC गटात कॅनडा तिसऱ्या स्थानावर दोन्ही संघांच्या खात्यात 1-1 गुण
भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : बलाढ्य बेल्जियमला सलामीच्या सामन्यात झुंजवणाऱ्या कॅनेडाने 'C' गटातील दुसऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील या निकालामुळे आफ्रिकेचे आव्हान जवळपास गटातच संपुष्टात आल्यात जमा आहे. कॅनेडाने मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या आशा अजूनही पल्लवीत ठेवल्या आहेत.
पहिल्या सत्रात आफ्रिकेला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु कॅनडाच्या गोलीने त्यांना यश मिळवू दिले नाही. त्याने दोन अप्रतिम बचाव करताना आफ्रिकेचे आक्रमण थोपवले. पहिल्या सत्रात आफ्रिकेच्या खेळाडूंनी चेंडूवर अधिक ताबा राखला असला तरी त्यांना कॅनडाची बचावभींत भेदण्यात अपयश आले. दोन-तीन वेळा त्यांना गोलपोस्ट जवळ जाऊनही गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात कॅनेडाकडून पलटवार झाला. त्यांनी आक्रमणाची धार तीव्र करताना आफ्रिकेच्या डी क्षेत्रात हल्ला चढवला. मात्र, आफ्रिकेच्या गोलरक्षकाने त्यांचे आक्रमण थोपवले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीतच राहिला. आफ्रिकेचे खेळाडू गोल करण्याच्या संधी तर निर्माण करत होते, परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात ते अपयशी ठरले. आफ्रिकेच्या खेळाडूंनी निर्माण केलेल्या संधीचा विचार केल्यास, त्यांचे 4-5 गोल सहज झाले असते, पण त्यांचे दुर्दैव. पण, 43 व्या मिनिटाला बिली एलतुलीने आफ्रिकेला मैदानी गोल करून दिला. त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. स्कॉट टुपरने 45 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक्सवर गोल करताना कॅनडाला बरोबरी मिळवून दिली. शेवटची पंधरा मिनिटे दोन्ही संघांचा कस पाहणार होता. आफ्रिकेला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्याउलट कॅनेडाला तीन, परंतु दोघांनाही गोल करता आला नाही. दोन्ही संघाचे गोलरक्षक खूपच सतर्क होते. अखेरच्या पाच मिनिटांत कॅनडाला मिळालेला कॉर्नर आफ्रिकेचा गोली जोन्स याने अचुकपणे अडवला. अखेरच्या अडीच मिनिटात आफ्रिकेला कॉर्नरची संधी मिळाली, परंतु त्यातून काहीच निकाल लागला नाही. अखेरच्या दीड मिनिटांत आफ्रिकेचा गोलरक्षक खेळाडूच्या भूमिकेत आला. आफ्रिकेने संपूर्ण अकरा खेळाडू आक्रमणात उतरवले, परंतु त्यांना 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.