भुवनेश्वर, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने शनिवारी ट्विटरवर याची अधिकृत घोषणा केली. हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल तेंडुलकरने मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि हॉकी इंडियाचे कौतुक केले.
हॉकी विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत भारताला 1-2 अशा फरकाने नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. तरीही येथील हॉकी चाहत्यांनी प्रत्येक सामन्यात मोठ्या संख्येने हजेरी लावून स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.
शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत बेल्जियमने 6-0 अशा फरकाने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे.