भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारतीय पुरुष हॉकी संघाने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत दमदार कामगिरी करताना 'C' गटात अव्वल स्थान राखले आहे. त्यामुळे भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. भारतीय खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विश्वचषक स्पर्धेची उत्सुकताही शिगेला पोहोचत आहे. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर अन्य दिवशीही प्रेक्षकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या हॉकीमय वातावरणात आणखी रंग भरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे राहू शकतात. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार उभय संघ उपांत्यपूर्व फेरीत भिडण्याची शक्यता आहे.
असं असेल समीकरण...भारतीय संघाने 'C' गटातील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य बेल्जियमला 2-2 असे बरोबरीत रोखले आणि चार गुणांसह अव्वल स्थानावर दावा सांगितला. या गटात भारत आणि बेल्जियम यांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत, परंतु गोलफरकाच्या जोरावर भारत आघाडीवर आहे. दोन्ही संघांचा एकेक सामना शिल्लक असून भारत अव्वल स्थान कायम राखण्याची शक्यता अधिक आहे. भारताला कॅनडाचा, तर बेल्जियमला दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.
पाकिस्तानचा संघ 'D' गटात एका सामन्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना उर्वरित दोन सामन्यांत नेदरलँड्स आणि जर्मनीचा सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले, तर पाकिस्तान गटात दुसऱ्या स्थानावर जाईल. विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहे, तर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघांना क्रॉस ओव्हर सामन्यांतून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवता येणार आहे.
पाकिस्तानने 'D' गटात दुसरे स्थान पटकावल्यात क्रॉस ओव्हर लढतीत त्यांना 'C' गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाचा सामना करावा लागेल आणि तेथे त्यांना कॅनडाचा सामना करावा लागेल. ही लढत जिंकणे पाकिस्तानसाठी सोपी गोष्ट असेल आणि तसे झाल्यास उपांत्यपूर्व फेरीत भारत- पाकिस्तान सामना होणे शक्य आहे.